नवीन वर्षाला सामोरे जातांना:
श्री स्वामी समर्थ
आज आपण नवीन वर्षाच्या आगमनाला सामोरे जात असतांना काही जण घरीच गोड धोड बनवून तर काही लोक बाहेर जेवायला जातात. खर तर हिंदु नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा - गुडीपाडव्याला सुरु होते पण आपल्या जीवनात बहुसंख्य वेळा आपण इंग्रजी कॅलेंडर चाच वापर करतो. हे येणारे नववर्ष आपल्यासमोर होऊन गेलेल्या वर्षातील घटनांची पडताळणी करून नवीन शिकवण, भविष्यातील संधीचा विचार, संकल्प, आव्हाने, योजना इ. घेऊन येत असते. नवीन वर्षाला सामोरे जातांना खर तर आपण स्वामींना सेवा करण्याचे बळ मागावे. जे जे योजना व संकल्प करू ने पूर्ण करूण्याचे बळ स्वामींना शरण जाऊन मागावे. परम पूज्य गुरुमाऊलींनी हितगुजात सांगितल्या प्रमाणे येणाऱ्या वर्षभरात सबब न सांगता १०० देवीपाठ, १०० रुद्र व १०० स्वामी चरित्र पारायण या वैयक्तिक सेवेचे नियोजन करावे. या सेवेने आपल्या आयुष्यात कुठलाही सांसारिक प्रश्न शिल्लक राहणार नाही, असा स्वामींचा आशीर्वाद आहे. याबरोबरच नक्कीच आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक आयुष्यात अमूलग्र बदल घडून येऊ शकतो. यात भर म्हणून जर आपण खालील त्रिसूत्री वापरली तर जीवन आजच्या पेक्षा उत्तम होण्यास मदत होईल यात शंका नाही.
(१) स्वामी उपासना
(२) आरोग्य उपासना
(३) कर्मयोग साधना,
(१) स्वामी उपासना :-
आपण कितपत स्वामी भक्त आणि सेवेकरी आहोत याचे सिंहवलोकन करणे गरजेचे आहे. स्वामींचा सेवेकरी म्हणजे नित्यसेवा, पंचमहायज्ञ, १० सेवेकरी घडवण्याचा मानस अंगी असावा. याबरोबरच ज्या गोष्टी लागून येतात त्याम्हणजे शाकाहारी राहणे, रोजीला स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः वाचन व ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप होय. पंच महायज्ञ रोजीला आपण केलात तर नारायण नागबली सारखे मोठे विधी आपल्याला करायची गरज पडणार नाही.
त्याचबरोबर रोज रात्री स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी आज १०८ चुका आमच्याकडून झाल्यात उद्या १०७ च होउ दया, पुढील दिवशी विनंती करावी की १०६ च
होऊ या अशा पद्धतीने १०८ दिवसात रोज विनंती केल्यास बिनचुक काम करण्याचा- आशिर्वाद स्वामी आपल्याला देतील. स्वामीचरित्रात सांगितल्या प्रमाणे- 'स्वामी नावाचा जप करता, चारी पुरुषार्य येती हाता, व श्रीस्वामी कार्य हा मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेणे सर्वार्थ पाविजे याप्रमाणे आपल्या आपल्या दैनंदिन वेळेत स्वामीसेवा शिस्तीने व सवयीने केल्यास कुठलाही सांसारिक प्रश्न आपल्याला शिल्लक उरणार नाही. स्वामी महाराज्यांच्या हम गया नही जिंदा है" या स्वामी वचनाची प्रचिती पावलोपावली भक्तांना व स्वामी सेवेकऱ्यांना येत असते. म्हणून आपण आपल्या दैनंदिन वेळेत स्वामींची नित्यसेवा करायला हवी. मोजून ३० मिनिटांची नित्यसेवा - स्वामी सारामृताचे क्रमश ३ अध्याय वाचन व ११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप. ही सेवा आपल्या जीवनात अमुलाग बदल घडवू शकते.
(२) आरोग्य उपासना :-
आपल्याकडे आरोग्यम धन संपदा म्हणजेच Health is wealth असे पुरातन काळापासून म्हटले गेले आहे. आपली सर्वात मोठी धन हानी कुठे होत असेल तर ते म्हणजे दवाखाना. आपली इच्छा असेल किंवा नसेल पण दवाखान्याचा खर्च आला तर तो करावाच लागतो या साठी आरोग्य टिकवणे गरजेचे आहे. आरोग्य म्हणजे पीळदार व दौलदार शरीर यष्टी असणे नव्हे तर आपण सतत ऊर्जावान, उत्तम शारीरिक रोग प्रतिकार क्षमता व सकारात्मक मानसिक अवस्था चे धनी असणे म्हणजे आपणास उत्तम आरोग्य लाभले आहे असे म्हणता येईल. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपणास २४ तास ही कधी कधी अपुरे पडतात असं वाटायला लागतात आणि आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी, पोट बाहेर येणे सुरु होत व आरोग्य टिकवणे हे आपल्याला अशक्यप्राय वाटायला लागत आणि आपण स्वतःलाच कारणे द्यायला लागतो की आता जमाना बदलला आहे. डायबेटीस, BP हे आजार तर सर्वांनाच आहेत तर आपल्यालाही होणार. परंतु जर आपण आपलं सकाळचं रुटीन बदललं तर यावर आपण मात करू शकतो. आरोग्यम धनसंपदा म्हटल्याप्रमाणे जस रोज काहीतरी काम करून आपण पैसे कमावतो तस आरोग्यासाठी वेळेची गुंतवणूक आवश्यक असते. यासाठी खूप मोठ मोठ्या गोष्टी जसे की ५ किलोमीटर धावणे, २ तास जिम इ. करण्याची गरज नाहीये तर रोज सकाळी आपण २० ते ४० मिनिटे दिली तर खूप आहेत पण यात सातत्य ठेवणे मात्र खूप गरजेचे आहे. पुरातन काळात आपले ऋषी मुनी सुद्धा त्यांच्या दिवसाची सुरवात ही योग व प्राणायमाने करत असत. आपण जर रोज सकाळी खालील गोष्टी आपल्या रुटीन मध्ये करू लागलो तर उत्तम आरोग्य अशक्य नाहीये.
१) सकाळी उठल्यावर शक्य असेल तेवढे पाणी प्यावे.
आपण कुठे ऐकतो की २ लिटर पाणी प्या. कोणी म्हणत गरम पाणी प्या. परंतु आपल्या क्षमते नुसार कोमट पाणी सकाळी प्यावे. साधारणपणे ३ ग्लास भरपूर होईल.
२) सकाळी चालायला जावे
कमीत कमी २० मिनिटे चालण्यास जावे. आपल्याकडे सायकल असल्यास आपण सायकलिंग सुद्धा करू शकतो. परंतु जेष्ठान्नी चालणेच उत्तम.
४) योगासने व सूक्ष्म व्यायाम
आपले स्नायू योग्य पद्धतीने शक्य तेवढे ताणले गेल्यास सियाटीका, फ्रॉजन शोल्डर या सारख्या बऱ्याच व्याधी टाळता येतात. खालील योगासनं आपणास जमेल तसे करायचा प्रयत्न करावा. स्नायू वर खूप ताण, किंवा स्वतःला त्रास होईल एवढ्या तीव्रतेने करणे टाळावे.
ताडासन
तिर्यक ताडासन
त्रिकोणासन
मंडूकासन
शाशकासन
गोमूखासन
पश्चिमत्तसन
पवनमुक्तासन
मर्कटा सन
उत्तानपादासन
४) प्राणायाम करणे
भस्त्रीका
कपालभाती
अनुलोम विलोम
वरील योगासने व प्राणायाम हे आपल्या रोजच्या जीवनातून निर्माण झालेल्या ज्याला आपण lifestyle diseases म्हणतो यातून आपणास नक्कीच मुक्तीची सुरुवात करून देऊ शकतात. यासाठी आपल्याला वेळ द्यायची आवश्यकता आहे. जशी थोडी थोडी गुंतवणूक करून मोठी आर्थिक संपत्ती जमा होते तशीच निरामय आरोग्यासाठी गुंतवणूक आपल्या रोज सकाळच्या दिलेल्या वेळेने होणार आहे. शरीराची एक स्वतःची memory असते, जस चहा पिणाऱ्या व्यक्तीला वेळेवर चहा लागतोच तसा एकदा आपण सवय केली की १०-१५ दिवसात हे आपल्या कडून सहज गत्या होऊ लागत. आपण मात्र सातत्य टिकावंण्याची गरज असते.
जसं जसे आपण वरील प्रमाणे स्वतःला वेळ देऊ तस तसे आपल्याला फरक जाणवेल. अगदी पहिल्या दिवसा पासून आपल्याला फरक जाणावायला लागतो. आपण कष्टाने कामावलेले पैसे जर डॉक्टर ला द्यायची इच्छा नसेल तर हाच एक पर्याय आहे. Prevention is better than cure म्हणजे उपचारपेक्षा प्रतिबंध च उत्तम आहे. आपण हे स्वतःला व व्यायामाला वेळ देऊनच प्रत्यक्षात आणू शकतो. शारीरिक स्वास्थ्य बरोबरच यातून मानसिक स्वास्थ्य सुद्धा प्राप्त होईल. महामारीच्या काळात आपण पाहिलेत की आजारी पडण्यापेक्षा लस घेतलेली बरी तशी ही आपली रोजची नैसर्गिक लस आपण सवयीने घेतली तर निरामय आरोग्याचे आपण सर्व धनी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
(३) कर्म योग साधना:
जन्माला येतांना आपण ५ प्रकारची ऋण घेऊ येत असतो. त्यांच्या निवारणा साठी आपण रोज पंच महायज्ञ करायचा असतो. यात देव यज्ञ, ऋषी यज्ञ, पितृ यज्ञ, मनुष्य यज्ञ आणि भूत यज्ञ होय. या बरोबरच संचित कर्माचे प्रारब्ध आणि त्याबरोबर आलेले दोष. यावरून च आपण आयुष्य सुख दुःख भोगत असतो. कर्म सिद्धांता नुसार कर्माच्या फलातून कोणाचीही मुक्तता नाही. स्वतः भगवंताला दुःख चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोणी. यातून आपल्याला स्वामी महाराज मात्र मुक्त करू शकतात कारण स्वामी चरित्रातील प्रसंगांचे दाखले दिल्यास आपल्याला समजेल की स्वामींनी कोणाचा मृत्यू टाळला तर दारिद्र्य दूर केल, तर कोणाला रोग मुक्त करून अदभूत आरोग्य प्रदान केल. हम गया नही जिंदा है - या वचना प्रमाणे आजही स्वामींच कार्य अविरत चालू आहे. आजही भक्तांना ते आशीर्वाद अनुभव, प्रचिती देतात. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने स्वामीकार्य प्रचंड वेगाने आजही सुरुये. प. पु. गुरूमाउलींच्या प्रेरणेने व मार्ग दर्शनाने १८ विभागातून ८०% समाज कार्य व २०% अध्यात्म या उक्ती नुसार सुरु आहे. यातून दरिद्र नारायणाची सेवा करून पुण्य प्राप्त करणे हाच मात्र उद्देश प्रत्येक सेवेकऱ्याचा असतो. यात आपण सहभागी होऊन गत जन्माचे पाप, दोष त्यातून आलेलं दुःख यावर मात करू शकतो. कारण हे कार्य स्वामींच आहे. स्वामी सदेह रोजीला ५ गावे फिरून भेटेल त्याला दुःख मुक्त करत असत. आता मात्र हीच संधी स्वामींनी आपल्याला दिली आहे. स्वामींना आपल्या वेळे देण्याची आवश्यकता आहे फक्त आणि आपण कधी विचारही केला नसेल असे सौख्य स्वामी यातून आपल्याला देतात असे कार्यरत सेवेकऱ्यांचे अनुभव आहेत. खरं तर हा विषय शब्दात मांडण्यासारखा नाहीये तर प्रत्यक्ष अनुभवाने शिक्षण्यासारखा आहे. म्हणून चला या नव वर्षात आपणही ही ग्राम व नागरी विकास अभियानात आपल्या नाजिकच्या स्वामी केंद्र मार्फत सहभागी होऊन व स्वामींचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा संकल्प करूया.
या त्रिसूत्रीत आपल्या ऐहिक व पारमार्थिक सुखाचे बिजरोपण व पुढे असे कार्य करत राहिल्यास सौख्य पीक आपल्या आयुष्य रुपी शेतीत बहरेल.
ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेषां शान्तिर्भवतु ।
सर्वेषां पूर्णंभवतु ।
सर्वेषां मंगलंभवतु ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
श्री स्वामी समर्थ
0 टिप्पण्या
If you have any doubt, Let me know.