दत्तजयंती हा जगभरातील स्वामी भक्तांसाठी पर्वणीचा काळ असतो. गुरुचरित्र या पावन तथा पाचवा वेद मानल्या जाणाऱ्या ग्रंथाचे मनोभावे सात दिवसाचे पारायण असंख्य सेवेकरी व भक्त जन करत असतात. त्यातून दत्त गुरूंचे अनेकविध अनुभव सेवेकरी भक्तांना येतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे भगवान शिव यांचा त्रिगुणात्मक शक्तीचा अविष्कार म्हणजे दत्त महाराज. भगवान दत्तात्रेय, दत्त गुरू, दत्त राज माऊली इ. विविध नावाने भक्तजन दत्त महाराजांना शरण जातात.
खरं तर कलियुगात धर्म एका पायावर उभा आहे असे म्हटले जाते व त्याचा तोल कधी जाईल काही नेम नाही. प्रतिकूल युगात धर्म टिकायचा असेल तर मानवाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. सदगुरू, परमगुरू, परत्परगुरू असे अनेकविध गुरू पण सर्वांची नाळ जुळते ती शेवटी गुरुतत्व भगवान दत्तात्रय म्हणजेच आपल्या प्रिय दत्तगुरुंशी. आजच्या निमित्ताने जाणून घेऊया दत्त गुरूंची अवतार कथा.
ब्रम्हदेवाने सृष्टीची रचना केल्यानंतर सात पुत्रांची उत्पत्ती केली,
त्यापैकी अत्रि ऋषी हे एक होत. अत्रि ऋषींची पत्नी अनसूया ही पतिव्रता आणि पतीसेवेने भगवती स्वरूपाला पोहचली होती. ती महान पतिव्रता असल्यामुळे स्वर्गाचे देवांना नित्य
धास्ती वाटत होती की ती आपल्या महान पतिव्रता धर्मामुळे प्राप्त तेज व शक्तीने आपले ऐश्वर्य
हिरावून घेईल. ही च भीती इंद्रादी देवतांनी ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती जवळ
जाऊन देवांनी व्यक्त केली. ती महान पतिव्रता असून नित्य अतिथी पूजा करते,
तिचे हे तपाचरण पाहून सूर्य देखील आपले तापमान वाढू देत नाही, अग्निही
शितल झाला, वायूही मंद वाहू लागला, तिच्या चरणाशी भूमीमाता देखील
नम्र झाली. तिने कुणाला वर दिला तरी ती व्यक्ती देवादिकांचे स्थान हिरावून
घेवू शकेल, असे माता अनुसयाचे वर्णन गुरुचरित्र अध्याय ४ मध्ये आलेलं आहे. असेच वर्णन इंद्राने त्रिमूर्तीना करून प्रार्थना केली की आमचे स्वर्गातील स्थानाचे
रक्षण करावे, नाहीतर आम्हाला अत्री व अनुसयेच्या दारी सेवक म्हणून रहावे लागेल."
हे ऐकून त्रिमूर्तीना क्रोध आला, ते म्हणाले, "आम्ही तिच्या व्रताचा भंग
करून नरकात पाठवून देवू" असे म्हणून ते पृथ्वीवर आले. त्यावेळी
अत्रि ऋषी नदीवर अनुष्ठानास गेले होते. अशा वेळी ते भिक्षुकांचा वेष घेवून
अत्रि ऋर्षीच्या आश्रमात क्षुधित म्हणजेच भुकेने व्याकुळ अतिथी म्हणून आले व अनसूयेस म्हणाले,
"आम्ही तुमची अतिथीसेवा व इच्छा भोजन दान याबद्दल ची कीर्ती ऐकून आलो आहोत.
आम्ही खूप क्षुधित आहोत. आम्हास तात्काळ भोजन मिळाले नाही तर अन्य
ठिकाणी जावू. "अनसूयेने त्यांचे चरण धुवून आसने देवून नम्रतेने नमस्कार केला.
ते म्हणाले, “आम्ही स्नान करूनच आलो आहोत, अत्रि ऋषींना यायला वेळ
लागेल, तरी आम्हास लगेच भोजन द्यावे." अनसूया मातेने लगेच भोजनाची
ताटे तयार केली व त्यांना पाटावर बसवून भोजन वाढण्यास सुरुवात केली.
तेव्हा ते म्हणाले, "आम्ही फार दुरून आलो आहे, त्यात तुम्ही फार सुंदर दिसता,तेव्हा आमची इच्छा आहे की आपण नग्न होवून अन्न वाढावे, नाहीतर आम्ही येथून निघून जातो" हे ऐकून अनसूया मनांत विचार करू लागली की हे कुणी थोर माझी परीक्षा घ्यायला आलेले दिसतात. अतिथीस विन्मुख पाठविणे योग्य नाही. माझें मन निर्मळ आहे, माझ्या पतिचे तपोबल माझ्या पाठीशी आहे, तेव्हा दृष्ट काम माझे काहीही अशुभ करणार नाही, असा विचार करून तिने सांगितले, "ठीक आहे, आपण शांतपणे भोजन करावे."
नंतर स्वयंपाक घरात जावून पतिचे स्मरण करून मनात विचार आणला की हे अतिथी मला लहान बाळासारखे आहेत व वस्त्रे काढून नग्न होवून बाहेर वाढायला आली तर ते तिघेही अतिथी बाळस्वरूप होवून ताटाजवळ लोळत होते. त्या बाळांना भयचकित दृष्टिने पाहून अनसूया परत वस्त्रे नेसून बाळांच्या जवळ आली. त्या क्षुधेने रडणाऱ्या बालकांना तिने कडेवर घेतले व त्यांना एक एक करून स्तनपान करविले. त्या पतिव्रता अनसूया मातेचे केवढे पातिव्रत्याचे तप? हे विश्व धारण करणाऱ्या शक्तींची भूक अनसूयामाता केवळ स्तनपानाने क्षमविते. या घटनेने अनसूया मातेची ब्रहा-विष्णू-महेश यांची माता म्हणून त्रिभुवनात ख्याति झाली. त्यानंतर त्या बालकांना पाळण्यात घालून अध्यात्मिक गीत त्यांना गावू लागली. एवढ्यांत माध्यान्ह काली अत्रिऋषी घरी येताच, गात असलेल्या अनसूयेस विचारले, "ही बालके कोणाची ? तेव्हा तिने सर्व काही घडलेले सांगितले. अत्रिऋषींनी अंतर्ज्ञानाने हे त्रिमुर्ती आहेत हे जाणून त्या बालकांना नमस्कार केला, त्यामुळे त्रिमुर्ती संतोषीत झाले व पाळण्यात बालके असतांनाच त्या त्रिमुर्ती अत्रिऋषीसमोर प्रकट झाल्या. त्यांनी संतुष्ट होवून अत्रिऋषीस वर मागण्यास सांगितले. अत्रिऋषींनी अनसूयेस वर मागण्यास सांगितले. अनसूया म्हणाली, "तुमच्या भक्तीने ईश्वर घरी आले, आपणच त्यांना वर मागा की ही तिन्ही बालके एकस्वरूप होवून पुत्रासमान रहावी." त्रिमुर्ती 'तथास्तु!' वर देवून निजधामी गेले.
ब्रम्हदेव चंद्र बालक झाला, विष्णू दत्त बालक झाले, महेश दुर्वास बालक झाले तेव्हा चंद्र व दुर्वास मातेच्या समोर प्रकट होवून त्यांनी मातेस विचारले, “आम्हांस आमच्या कार्यास स्थानावर जाण्याची आज्ञा मिळावी, दत्त बालक आपल्या घरी राहिल, त्यांच्याच स्वरूपी आम्ही त्रिमूर्ती आहोत है जाणून रहावे." आज्ञा मिळताच चंद्र व दुर्वास आपल्या स्थानी कार्यास गेले व दत्त बालक त्रिमुर्ती स्वरूपात अनसूया मातेच्या घरी राहिले.
श्री दत्त महाराजांचा अवतार धर्माचे रक्षण व दुःखी पिडीत' भक्तांचे रक्षण यासाठी होता. ही घटना सत्य युगातील आहे, तेव्हा गुरू प्रणित मार्ग हा सनातन आहे. त्यापुढे अनेक गुरू शिष्य परंपरा निर्माण झाल्या परंतु मुळ गुरू तत्व हे दत्तगुरु असल्याने ते सर्वांचे गुरू आहेत. अनेकांना दुःख मुक्ती भगवान दत्तात्रे्यांनी दिली.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सप्ताह काळात श्री गुरू चरित्र ग्रंथाचे विधिवत पारायण व प्रहरे होतात. दुर्मिळ यज्ञ व याग या सेवेची संधी गोर गरीब दुःखी कष्टी प्रत्येकाला उपलब्ध असते. अशा अनेक सामुदायिक सेवेने खूप काही शिकायला मिळते. अनेक सेवेकरी यात सहभागी होऊन दत्त व स्वामी महाराजांचे कृपा, आशीर्वाद प्राप्त करून सुखी होतात.
0 टिप्पण्या
If you have any doubt, Let me know.