श्री स्वामी समर्थ
प्रत्येक व्यक्ती हा कधी ना कधी काहीतरी अडचणीत सापडत असतो, त्यावेळी त्याला आधाराची गरज असते. पूर्व कर्माने समजून घेणार कुणी असेल तर ठीक पण बहुतेक लोकांना देवाची आठवण अडचणीच्या प्रसंगी होतं असते. याबद्दल आपल्याकडे कबीरजींचा एक दोहा प्रसिद्ध आहे की 'दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय। जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय'. अर्थ असा की देवाचे स्मरण केले तर दुःख होणारच नाही. आजच्या काळात मात्र आध्यात्मिक असणे काही वेळा इतरांना खटकत. अनेक नास्तिक व स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेणारे लोक आरती केल्याने, धूप पेटवल्याने व स्मरण, भजन केल्याने काय होतं असं म्हणत भक्तांची टिंगल करतांना दिसतात. परंतु भक्ती म्हणजे काय व पूजा, धूप, भजन, जप यांचे महत्व दोघानांही माहित नसते. त्यामुळे आपल्या सर्वांना माहित असावे, मलाही समजावे म्हणून हा लेखनाचा खटाटोप.
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं,अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ।
भक्ती म्हणजे अमुक किंवा तमुक असं त्याला एका विशिष्ट व्याख्येत मांडणे तसे जवळ जवळ अशक्य आहे. प्रत्येकाची प्रकृती व विचार वेगवेगळे असल्याने प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. एखादा महापुरुष ज्याने भगवत साक्षात्कार अनुभवला आहे, जो भक्तीत रममाण आहे असा व्यक्तीच / संतच यात दुसऱ्याला मदत करू शकतो. आपल्याकडे असे संत महात्मे कमी नाहीत, विशेष करून महाराष्ट्राला संतांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. अनुभव व प्रत्यय वेगळा असला तरी सर्वांचे उद्दिष्ट एकच असते ते म्हणजे भगवंतांची प्राप्ती, मोक्षप्राप्ती. भगवंताचे स्वरूप सचिदानंद म्हणजे प्रेम व आनंद असे असल्याने आपल्या सर्वांच्या ठिकाणी सुद्धा नेहमी सुख, शांती आणि आनंद याचे आकर्षण असते. प्रत्येकाला वाटते की आपण सुखी व आनंदी असावे. हा जणू प्रत्यय च आहे भगवंताचा / स्वामींचा अंश प्रत्येकाच्या मध्ये आहेच.
जर सर्वांचे उद्दिष्ट स्वामी प्राप्तीच आहे तर ते मिळणार कसे, त्याचेच उत्तर आहे भक्ती. जरी देवाला प्राप्त करण्याचे योग, कर्म व भक्ती असे विविध मार्ग असले तरी संसारी / गृहस्थ दांपत्याला भक्ती हा सुलभ व श्रेष्ठ मार्ग अनुकूल ठरतो. रोजच्या सांसारिक कर्म करत करत, कठोर तपस्या न करता (हिमालयात न जाता) आपल्याला भक्तीने स्वामींची सहज प्रचिती येते.
मग या भक्तीचे मार्ग कुठले तर ते सुद्धा आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेत. ते म्हणजे
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं,अर्चनं वंदनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् ।
वरील श्लोकात एकूण ९ भक्तीचे भाव सांगितले आहेत.
१) श्रवणं - म्हणजेच श्रवण / ऐकणे. देवबद्दल ऐकणे, देवाचे महात्म्य, कथा, लीला, गुण, चरित्र हे श्रद्धा पूर्वक ऐकणे ही श्रवण भक्ती आहे. एखाद्या नवीन उपासकाला देवाची भक्ती सुरु करण्याचा एक मार्गही ठरु शकतो. याने आपल्यात स्वामींबद्दल विश्वास निर्माण होतो. कोणालाही साधना, भक्ती सुरु करतांना मनाचा त्रास होतोच. आपले मन आपल्यास सहजासहजी भौतिकते पलीकडे जाऊ देत नाही. पण ज्यावेळी आपण स्वामी चरित्र श्रवण करतो, ऐकतो त्याचे चिंतन करतो तेव्हाच आपल्याला आत्मबळ प्राप्त होते व साधनेत आपले मन लागते.
२) कीर्तनं - कीर्तन म्हणजे देवाचं चरित्र, कथा, गुण हे ताल लयीत संगीतबद्ध करून त्यात लीन होणे. यात भक्त आपले चित्त व आजूबाजूच्या जगाचे स्वरूप विसरून भगवंत नामात तल्लीन होतात, जगाचे भान विसरतात. कीर्तन सेवेने मानवाच्या अंगी असलेले षडरिपू बलहीन व्हायला सुरवात होते. षडरिपू म्हणजे आपल्या ठायी असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे सहा भगवंत प्राप्तीत बाधक असतात म्हणून त्यांना सहा रिपू म्हणजे शत्रु मानले आहेत. आपल्या भाग्याने आपण भारतासारख्या समृद्ध देशात जन्म घेतला असून इथे प्रत्यक्ष परब्रम्ह स्वामी अवतरले व आपल्या लीला त्यांनी दाखवल्या. तस्वामींच्या लीला व चरित्राचे वाचन, चिंतन, मनन व सामूहिक गायन सुद्धा आपल्याला क्षणात दुःख मुक्त करून मनात नवी उमेद निर्माण करणारे असते. अनेक जटील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज प्राप्त होतात.
३) स्मरणं - म्हणजे स्मरण. नेहमी स्वामींचे स्मरण करत राहणे. यालाच आपण नाम स्मरण असे म्हणतो. स्वामी चरित्रकार म्हणतात की 'श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र | प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे ||' म्हणजेच स्वामींचे अखंड नामस्मरण केल्याने साधक हवे ते प्राप्त करू शकतो. म्हणजेच स्वामी त्याला प्राप्त होऊ शकतात. स्वामी प्राप्ती म्हणजेच अखंड आनंद व मोक्ष. हा सर्वात सहज व सर्वांना शक्य असा भक्तीचा भाव आहे.
४) पादसेवनं - म्हणजे चरण सेवा. जेव्हा आपण चरण सेवा करतो तेव्हा आपला अहंकार नष्ट होऊन आपण सेवेत प्रविण होतो व आध्यत्मिक साधनेत वर जातो. त्यामुळे चरण सेवा, चरण पूजन याचे विशेष महत्व आहे. कलियुगात मन मायेने भ्रमीत होईल पण त्याला गुरू वचन व गुरूंचा उपदेश माहित असेल तरच तो मायेवर विजय मिळवू शकतो. म्हणून आजच्या काळात गुरू, सदगुरु, परमगुरू, परत्पर गुरू आणि गुरू तत्व श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण गेल्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. चरण सेवा वा पादुका पूजन या सेवेने आपण स्वामींशी जुळू लागतो व नवचैतन्य स्वामी महाराज आपल्या आयुष्यात भरतात.
५) अर्चनं - म्हणजे विविध भौतिक साधने आधी स्वामींना समर्पित करावी. त्यातील दोष स्वामी महाराज्यांच्या अधिष्ठानाने नष्ट होतात व आपणास प्रसाद प्राप्त होतो. नैवेद्य, आरती व प्रसाद या भावात येतो. आरती म्हणतांना आपण स्वामींना आर्त हाक मारत असतो ते केवळ त्यांच्या कृपा प्राप्ती साठी, कारण स्वामीकृपेपलीकडे विश्व नाही. स्वामी कृपा झाल्यास सर्व दुःखातुन मुक्ती होते.
६) वंदनं - म्हणजे नमस्कार करणे. जिथे जिथे आपल्याला चांगले दिसेल ते स्वामी स्वरूपच मानावे कारण 'चराचराते व्यापूनी उरला' याप्रमाणे सर्व सृष्टी ही स्वामीरूपच आहे. जिथे जिथे आपल्याला सुख मिळेल ते स्वामींनी दिले असे मानावे व दुःख मिळेल तिथे स्वामी असीम कृपेने पूर्व कर्मातुन मुक्त करत आहेत असे समजावे.
७) दास्यं - म्हणजे दास होणे. आपल्या आयुष्याचे मालकच नाही तर चालक आणि पालक स्वामीच असून त्यांचे स्वामीत्व स्वीकार करणे. याने आपल्याला अलौकिक सुखाची प्राप्ती होते. जे होत आहे ते स्वामीच घडवतात असा दुर्मिळ अनुभव या भावात आपल्याला प्राप्त होतो. स्वामींना भूषणवह होईल असे वागावे व स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहणे म्हणजेच दास्यवृत्ती होय. असंख्य जन्माच्या पापातून स्वामी दासाला मुक्त करतात व परामानंद प्राप्त करवून देतात.
८) सख्यम् - म्हणजे सौख्य. अनेक सेवेकरी हे स्वामींना आपले कुटुंब प्रमुख मानून कौटुंबिक जबाबदारी ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे असे मानतात. स्वामींना घराचे सदस्य म्हणल्यावर स्वामी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन आपला भार हलका करतात. स्वामींचे छत्र आपल्या घरावर असल्यास कुठलेही संकट क्षणात दूर होते.
९) आत्मनिवेदनम् - म्हणजे स्वामींना शरण जाणे. अनन्य शरणागत भक्ताचा योगक्षेम स्वामी महाराज चालवतात. यात अहंकाराची जाणीव उरत नाही. जेव्हा इतर कुठलाही मार्ग उरत नाही आणि संपूर्ण शक्तिहीन होतो तेव्हा स्वामींशिवाय कोणी नाही ही जाणीव निर्माण होते. म्हणून जेव्हा भक्त कायमचा स्वतःला स्वामी चरणी समर्पित करतो तेव्हा स्वामीच त्याचा योगक्षेम म्हणजे त्याला जीवनात काय मिळेल काय होईल ते त्याच्या जीवनात कोण राहील कोण नाही, हे ठरवतात. वाचण्या बोलण्यात हे सोपं वाटत असल तरी ही अवस्था प्राप्त व्हायला वरील ८ भाव आपल्या ठिकाणी असावे लागतात.
वरील ९ भावांपैकी आपण कुठल्याही प्रकारे आपले निहित कर्म करत करत स्वामी भक्ती, सेवा सुरु करावी. मानवी जीवनाचे उद्दिष्ट भगवत प्राप्ती असून जन्म मृत्यू च्या फेऱ्यातून सुटणे आहे. या गूढ व आध्यत्मिक गोष्टींचे मनन, चिंतन व अवलोकन केल्यास आपल्याला याचे महत्व तर समजेलच पण आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येईल. आपण सुद्धा स्वामींचाच अंश आहोत पण मायेच्या पसाऱ्यात असे फसलो की स्वामींपासून किती दूर आहोत याचीही जाणीव विसरलो आहोत.
चला तर मकर संक्रांतीच्या अमृत पर्वावर स्वामी सेवेचा प्रवास सुरु करू....
श्री स्वामी चरणार्पणमस्तु..!!!
श्री स्वामी समर्थ

0 टिप्पण्या
If you have any doubt, Let me know.